नेते भाषण झोडत असताना तो गळफास घेत होता ! मराठवाड्यात दर दिवशी दोन शेतकरी आत्महत्या होतात; बीड जिल्ह्यात सर्वाधिक 56 : मदत अडकली आचारसंहितेच्या विळख्यात !

Foto

 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पुढारी आणि प्रशासन गर्क असताना दुष्काळाच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी मात्र गळफास घेत होता. मराठवाड्यातील हे विदारक चित्र काळजाचे पाणी पाणी करणारेच आहे.मराठवाड्यात दिवसाकाठी किमान दोन-तीन शेतकरी आत्महत्या होत आहेत. निवडणूक आचार सहितेमुळे या कुटुंबांना मदत मिळण्याचा मार्ग खडतर झाल्याचे दिसते. वरुणराजाच्या कृपेने मराठवाड्यात दुष्काळाचे भयंकर सावट पसरले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने शेती उध्वस्त झाली. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. यावर्षी तर भीषण परिस्थिती आहे. खरीप हंगामातील उत्पन्नही शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाच्या खाण्याचे वांदे होत आहेत. धान्य नाही आणि पिण्याला पाणीही नाही, अशी भयाण स्थिती आहे. अशा दुष्काळी परिस्थिती गेल्या महिनाभरापासून निवडणुकांचा माहोल असल्याने प्रशासन निवडणुकांच्या कामात अडकले. निराधार शेतकरी मात्र मरणाला कवटाळताना दिसतो. मराठवाड्यात गेल्या साडे तीन महिन्यात तब्बल २३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत यापैकी १५३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहे तर ५४ प्रकरणे पात्र ठरली असून २८ प्रकरणे चौकशीविना प्रलंबित आहेत. आतापर्यंत १३१ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाखाची मदत शासनातर्फे देण्यात आली. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत ५६ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवले. त्याखालोखाल उस्मानाबाद जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यात ३०, लातूर २६, जालना २१, परभणी १८ तर हिंगोली जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४० आत्महत्याग्रस्त कुटुंबांपैकी केवळ ३ कुटुंबांना आतापर्यंत मदत देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ३० पैकी केवळ १३ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत मिळाली.

 तो गळफास घेत होता 
निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय पक्ष आणि नेत्यांनी शेकडो कोटींचा खर्च करून प्रचार सभा घेतल्या. अनेक नेते मंडळी विमान आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत करीत होती. राजकीय पक्ष वचनांची आणि आश्वासनाची गाठोडी सोडत असताना शेतकरी मात्र गळफास घेत होता, असे दुर्दैवी चित्र मराठवाड्यात दिसून आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker